पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने शाळा, महाविद्यालयापाठोपाठ महापालिकेचे शहरातील सर्व सार्वजनिक उद्याने 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी गुरूवारी (दि.11) काढला आहे.
करोना संक्रमण शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग गेल्या 3 आठवड्यापासून बंद करण्यात आले आहेत. आता, पालिकेचे सर्व उद्याने बंद करण्यात आली आहे.
तसेच, रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी कायम असणार आहे. त्यातून जीवनावश्यक वस्तू दूध, भाजीपाला, फळे पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांची वाहने वगळण्यात आली आहेत.