- मर्यादित स्वरुपात धार्मिक विधी
पिंपरी – दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी होणारी महाशिवरात्री यंदा साधेपणाने साजरी झाली. शहरातील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी बंद होती. त्यामुळे भाविकांना बाहेरुनच दर्शन घ्यावे लागले. शहराच्या विविध भागांमधील शिव मंदिरांत फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई केली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा महाशिवरात्र साध्या पद्धतीने मर्यादित स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्यामुळे दरवर्षी भाविकांच्या लांबच लांब रांगा असणारी शहरातील शिवालये यंदा भाविकांच्या गर्दीने गजबजली नाहीत. शहरातील धनेश्वर, वाघेश्वर या प्राचीन मंदिरांसोबत इतर भागांमधील शिव मंदिरांबाहेर लहानसे शिवलिंग ठेवत भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाविक यंदा तुरळक प्रमाणात शिवलिंगाच्या दर्शनाकरिता आल्याचे चित्र होते.
पिंपळे सौदागर येथील शिव शंभो सेवा मंडळ यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दर वर्षी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. यंदा 8 ते 15 मार्च यादरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार होते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कार्यक्रम रद्द करण्यात आले.