नवी दिल्ली – नवीन वर्षात काय दडले आहे याबाबत सर्वांनाच कुतूहल असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रिय सण आणि उत्सव कधी आहेत याबाबत लोकांना जास्त उत्सुकता असते. 2023 या नवीन वर्षामध्ये मात्र सर्वच सण आणि उत्सव लांबले आहेत. भारतीय कालगणनेतील श्रावण हा महिना यावर्षी अधिक आला असल्याने त्याचा परिणाम म्हणून सर्वच भारतीय सण आणि उत्सव उशिरा साजरे होणार आहेत.
भारतीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर यांचा मेळ लावण्यासाठी दर तीन वर्षांनी एक मराठी महिना अधिक येतो. ज्या मराठी वर्षांमध्ये अधिक महिना येतो त्यानंतरचे इंग्रजी वर्ष हे लीप ईयर म्हणून मानले जाते. या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. भारतीय कालगणनेचे वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होणार असले तरी यावर्षी श्रावण महिना अधिक आला असल्याने या महिन्यानंतर येणारे सर्वच सण आणि उत्सव उशिरा होणार आहेत.
महत्वाचे म्हणजे यावर्षी अधिक महिना आला असल्याने संक्रांतही 14 जानेवारी ऐवजी 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा सर्वात धार्मिक महिना मानला जातो. श्रावणी सोमवार मंगळागौर नाग पंचमी असे अनेक सण या महिन्यामध्ये असतात. यावर्षी श्रावण हाच अधिक महिना आला असल्याने नेहमी श्रावणामध्ये साजरे न केले जाणारे हे सर्व सण अधिक महिन्यात साजरे न करता निजश्रावणामध्ये साजरे केले जाणार आहेत.
अधिक श्रावण 18 जुलै रोजी सुरू होत आहे, तर नेहमीचा श्रावण 17 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी असेल. भाद्रपदमध्ये येणारा गणेशोत्सव यावर्षी 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे तर अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी आहे. नवरात्राचा प्रारंभ 15 ऑक्टोबर रोजी होणार असून 24 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. 2023 मधील दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून 15 नोव्हेंबरला भाऊबीज आहे.
साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी दत्त जयंती 2023 मध्ये मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. श्रावण महिना अधिक आल्याने हे सर्वच सण आणि उत्सव साधारण तीन आठवडे ते महिनाभर पुढे गेले आहेत. यावर्षी दोन श्रावण महिने आले असले तरी श्रावण महिन्यामधील सर्व सण आणि उत्सव हे अधिक महिन्यात साजरे न करता निजश्रावण मध्ये साजरे केले जाणार आहेत श्रावणी सोमवार असो किंवा मंगळावर व्रत असो हे सर्व सण निज श्रावणात साजरे करावे लागणार आहेत.