नवी दिल्ली – लष्कराच्या साउथ वेस्टर्न कमांडशी संलग्न असलेल्या इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्व्हिस (आयडीएएस)मधील उमाशंकर कुशवाह नावाच्या अधिकाऱ्याला 10 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केल्यानंतर सीबीआयने त्याच्या ठिकाणांवर मारलेल्या छाप्यांमध्ये 40 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.
जयपूरमधील दक्षिण पश्चिम कमांडमध्ये एकात्मिक आर्थिक सल्लागार म्हणून काम करीत असलेले 1998 च्या बॅचचे अधिकारी उमाशंकर प्रसाद कुशवाह यांना,त्यांच्या दोन अन्य सहकारी कर्मचाऱ्यांसह अटक करण्यात आली आहे. तसेच सुनील कुमार, प्रबजिंदर सिंग ब्रार आणि दिनेश कुमार जिंदाल या तीन खासगी व्यक्तींनाही लाचखोरीच्या आरोपाखाली गुरुवारी अटक करण्यात आली.
तीन खाजगी कंपन्यांच्या आरोपींनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कट रचला आणि दक्षिण पश्चिम कमांडमधील विविध ठिकाणी संरक्षण सेवांच्या आऊटसोर्सिंगशी संबंधित कामे मिळवली. नियमांच्या तरतुदींना बगल देऊन या कामांच्या निवाड्यात अवाजवी मर्जी दाखवत गैरव्यवहार करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. लष्कराशी संबंधीत अधिकारी कुशवाह यांनी आपल्या मर्जीतील या लोकांना तातडीने बिले मंजुर करून लाचखोरी केली.