पुणे, दि. 12 – जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक दि. 17 ऑक्टोबरला होत आहे. “डीपीडीसी’ने पालकमंत्री अजित पवार असताना मंजूर केलेल्या कामाविषयी नवे पालकमंत्री चंदक्रांत पाटील हे काय भूमिका घेणार आहे, हे यात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या कामात फेरबदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन जिल्हा नियोजनच्या कामांचा आढावा घेतला. यात ऐनवेळी मंजूर केलेल्या कामांची निधीनिहाय यादी त्यांनी मागवली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी शनिवारी (दि.15) संबंधित सर्व अधिकाऱ्यांची पूर्वतयारीची बैठक बोलावली आहे.
त्यामध्ये आणखी एकदा कामांचा आढावा घेऊन 17 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता डीपीडीसी बैठक होणार आहे.
तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षातील सुमारे 725 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पण, नवे सरकार येताच आराखड्याला स्थगिती देण्यात आली होती. पालकमंत्री नियुक्तीनंतर ही स्थगिती हटविण्यात आली असून या आराखड्याचा फेरविचार करून कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. बैठकीपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी पक्षीय पातळीवर बैठक घेऊन नवी कामे आणि त्यांच्या याद्या तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार जुन्या आराखड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे.