मंचर, (प्रतिनिधी) – नागापूर येथील आत्महत्या व अत्याचार प्रकरणात देवदत्त निकम हे सूत्रधार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निकम यांना तातडीने अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मंचर येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिला.
निकम यांच्या नागापूर येथील शेतातील घरामध्ये एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्याचा निषेध करीत मंचर पोलीस ठाण्यावर रविवार, दि. ५ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शहा म्हणाले, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही. तर मोठे आंदोलन केले जाईल. योग्य दिशेने तपास होत नसेल तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शहा यांनी दिला.
यावेळी उपस्थितांनी दोषींना अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, आदिवासी समाजाचे नेते संजय गवारी, सुषमा शिंदे, माणिक गावडे, कल्पेश बाणखेले, रामदास जाधव, सुहास बाणखेले उपस्थित होते. याबाबत निवेदन मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांना दिले.
या प्रकरणाशी माझा संबंध नाही – देवदत्त निकम
नागापूर येथे घडलेल्या घटनेतील घनश्याम निकम व मी वेगवेगळ्या वस्तीवर राहतो. जमीन शेजारीच आहे. त्यांच्या शेतावर सदर घटना घडली. पण, या घटनेचा व माझा कसलाही संबंध नाही. आरोपीला अटकही झाली आहे. पण, केवळ राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर आरोप केले जात असून ते सर्व आरोप निराधार आहेत. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा.