गेल्या अनेक दिवसांपासून ‘गायब’ असलेले अलिबाबा प्रमुख जॅक मा अखेर प्रकटले

बीजिंग – चीनमधील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबाबा संस्थेचे प्रमुख जॅक मा हे गेल्या काही दिवसांच्या अज्ञातवासानंतर लोकांपुढे प्रकटले आहेत. त्यातून त्यांच्या हयातीची खात्रीही लोकांना पटली आहे.

चीनमधील ग्रामीण भागात शिक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या एका कार्यक्रमाला त्यांनी ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. त्यांच्याच वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

चीन सरकारच्या उद्योग व्यवसायविषयक धोरणावर त्यांनी जाहीर टीका केली होती. त्यानंतर ते अचानक गायब झाले होते. त्यांचा ठावठिकाणा कोणालाच समजला नव्हता. त्यामुळे चीन सरकारनेच त्यांचे काही तरी बरेवाईट केले असावे असा कयास व्यक्त केला जात होता. ते हयात असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर त्यांच्या अलिबाबा कंपनीचे शेअर्स हॉंगकॉंग बाजारात चार टक्‍क्‍यांनी वधारले.

आजच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की मी आणि माझे काही सहकारी चिंतनात व्यस्त होतो. आता यापुढे आपण शिक्षण क्षेत्रातील कामावर अधिक लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करून तेथे क्रांती घडवणे ही आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

अत्यंत अल्पावधीत मा यांनी आपले उद्योग साम्राज्य उभारले होते. त्यांनी आर्थिक क्षेत्रात घेतलेली ही उत्तुंग झेप अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली होती. जॅक मा यांनी आज ऑनलाईन मीडियाद्वारे आपले दर्शन दिले असले तरी त्यांचा नेमका ठावठिकाणा कोठे आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.