पुणे – शहरात करोनाचा कहर काही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. आजही करोनाबाधितांच्या संख्येने “डबल सेंच्युरी’ मारत 24 तासांतील सर्वाधिक 208ची संख्या पार केली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 4 हजार 107 वर जाऊन पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या पाच दिवसांत करोनाने एक हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे.
शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शहराने मोकळा श्वास घेतला असा “गोड गैरसमज’करून नागरिक घराबाहेर पडले. मात्र, यातून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी (दि. 20) दिवसभरात 159 जणांना घरी सोडण्यात आले, नायडू रुग्णालयातील 120, ससूनमधील 8 तर खासगी रुग्णालयातील 31 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर प्रकृती चिंताजनक असलेल्यांची संख्याही वाढत आहे. सद्यस्थितीत 169 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 44 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून करोना तपासणीची संख्या वाढली असून आज दिवसभरात 1 हजार 733 जणांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये 208 बाधित व्यक्ती आढळून आले आहे. 1 हजार 698 बधित व्यक्तींवर उपचार सुरू असून, त्यामध्ये नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयात 1 हजार 63 जणांवर उपचार सुरू आहेत. ससूनमध्ये 153 तर खासगी रुग्णालयात 482 जणांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, कॉरनटाइन व्यक्तींचीही संख्या आता 4 हजारांच्या वर पोहचली आहे.
सात जणांचा मृत्यू…
करोनामुळे आज सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये पुणे पोलीस वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. एकूण मृत्यूमध्ये 5 महिला व 2 पुरुष यांचा समावेश आहे. वय वर्षे 42 ते 84 या वयोगटातील हे मृत व्यक्ती असून, त्यातील काहींची जुन्या आजाराची हिस्ट्री असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.