फलटण -मुंबईतील कुर्ला येथून फलटण शहरालागतच्या कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील अक्षतनगर येथे सोमवारी (दि. 18) कुटुंबासह आलेल्या 74 वर्षांच्या वृद्धाचा काही तासांतच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल दोन दिवसानंतर बुधवारी (दि. 20) रोजी रात्री उशिरा आला. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोळकी व फलटण शहरात घबराट पसरली आहे.
हा वृद्ध मुंबईतून आला असल्याने मृत्यूनंतरही करोनाचा संशयित रुग्ण म्हणून त्याच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल बुधवारी (दि. 20) पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृद्धाच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या पंधरा जणांना शेती शाळेतील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, गटविकास अधिकारी अमिता गावडे, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, ग्रामविकास अधिकारी यांनी रात्री उशिरा अक्षतनगर येथे भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर तेथील ब्रह्मा हॉटेल ते आरोग्य उपकेंद्रापर्यंतचा भाग मायक्रो कंटेंनमेंट झोन, म्हणजे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.