सातारा -सातारा शहरात वॉर्ड क्रं 12 (गुरूवार परज) मध्ये बुधवारी निर्जंतुकीकरण मोहिम राबवण्यात आली. वॉर्डातील बहुसंख्य इमारतीवर नगरसेवक अल्लाउद्दीन शेख यांच्या पुढाकाराने औषध फवारणी करण्यात आली. आरोग्य विभागाने या वॉर्डाची फवारणी का मागे ठेवली? अशी विचारणा नगरसेवक शेख यांनी पालिकेत येऊन केल्यावर आरोग्य विभागाची धावपळ झाली. करोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू लागल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढविण्यात आल्या आहे. सातारा शहरातील पाच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात सोडियम हायपोक्लोराईटद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात असून, स्वच्छतेवरही भर दिला जात आहे.
शहरात करोनाबाधित रुग्ण आढळून येण्यापूर्वी जिल्हा व पालिका प्रशासनाने करोनाला थोपविण्यासाठी कंबर कसली आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचारी व पालिका प्रशासनाचा गेल्या पन्नास दिवसांपासून करोनाविरुद्ध लढा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या अद्यापही नियंत्रणात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीतील काही अटी शिथिल केल्या असल्या तरी सूक्ष्म प्रतिबंधितक्षेत्रासह प्रत्येक प्रभागात सुरक्षिततेच्या उपायोजना तीव्र करण्यात आल्या आहेत.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये पालिकेकडून बुधवारी सकाळी निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत औषध फवारणी करणारी पथके गुरुवार परज परिसरात दिसून आली. येथील इमारती, घरांचे दरवाजे, खिडक्या, लोखंडी रेलिंग, दुकान गाळे यांसह ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. ही मोहीम शहरातील प्रत्येक प्रभागात टप्प्या-टप्प्याने राबविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सदरबाझार, दौलतनगर, बुधवार नाका, समर्थ मंदिर परिसर, गोडोली, कॅंप इस्टेट (देवी कॉलनी) या भागात पुन्हा एकदा औषध फवारणी मोहिम राबवणार असल्याचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सांगितले.