आळंदी – पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी लांबवल्याची घटना आळंदी (ता. खेड) शहरातील आवारी हॉस्पिटल समोर घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर रंधवे (वय 72, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
आवारी हॉस्पिटल समोरून रंधवे जात होते, त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्यांच्यासमोर आली व तुम्ही गांजा विकता मी पोलीस असून त्याने रंधवे यांची तपासणी केली. त्यांच्या खिशात हात घालून रुमाल, पैसे व मोबाइल काढला. तसेच गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठ्या काढून सर्व ऐवज रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले. तो रुमाल रंधवे यांच्या खिशात ठेवला आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यातील सोन्याची चेन आणि अंगठ्या असा 48 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.