तेहरान : जगातील प्रमुख दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाचा नवीन प्रमुख अल आदिल इराणमधून आपली सूत्रे हलवत असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या कारवाईत अल कायदाचा प्रमुख अल जवाहरी याचा खात्मा झाल्यानंतर जुलै 22 पासून अल आदिल याने सूत्रे सांभाळली असून इराणमध्ये राहून तो दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करत आहे.
अल आदिल मूळचा इजिप्तचा असून अल कायद्याच्या स्थापनेपासून तो या संघटनेशी संबंधित आहे. त्याचा या संघटनेवर मोठा प्रभाव असल्यानेच अल जवाहरीच्या खात्मानंतर आदिल कडे संघटनेची जबाबदारी आली. 2002 पासूनच अलआदिल इराण मध्ये राहत असून तेथूनच तो संपूर्ण दहशतवादी कारवायांची सूत्रे हाताळत आहे. मधल्या काही कालावधीमध्ये तो पाकिस्तान मध्येही गेला होता. पण पुन्हा एकदा इराणमध्ये येऊन तेथूनच तो संघटना चालवत आहे.
आदिलच्या या हालचालीबाबतची माहिती संयुक्त राष्ट्र संघाने प्रसारित केली आहे. आतापर्यंत अल आदिलबाबत खूपच कमी माहिती प्रसारमाध्यमासमोर आली होती. अमेरिकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजनही अल आदिलने केले होते असे बोलले जाते. वयाच्या 30 व्या वर्षीच आदिलने आपला दबदबा निर्माण केला होता तेव्हा सोमालियामध्ये ब्लॅक हॉक डाऊन या नावाची दहशतवादी कारवाई त्याने पूर्ण केली होती.
ज्यामध्ये 19 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. 2011 मध्ये अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर अल कायदाचा प्रमुख रणनीतीकार म्हणून अल आदिलकडे पाहिले जाते. ईजिप्तच्या लष्करामध्ये काही काळ काम केलेला अलआदिल स्वतःला न्यायाची तलवार असे म्हणतो. त्यांची एकूण कारकीर्दच खतरनाक असल्याने एफबीआयच्या आणि अनेक जगातील अनेक तपास संस्थांच्या मोस्ट वॉंटेड लिस्टवर त्याचे नाव आहे.