“ओ साकी साकी’, “शहर की लडकी’ आणि “दिलबर’ या जुन्या हिट गाण्यांचे रिक्रिएशन केल्यानंतर गायिका तुलसी आणि मिका आणखी एका गाण्याचे रिक्रिएशन करणार आहेत. 1998 मध्ये आलेल्या “दुल्हे राजा’मधील प्रसिद्ध “अखियोंसे गोली मारे’ हे गाणे आता नव्या ढंगामध्ये प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहे. हे मूळ गाणे गोविंदा आणि रविना टंडनवर चित्रीत झाले होते.
कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेच्या आगामी “पती, पत्नी और वो’मध्ये हे नवीन ढंगातले गाणे समाविष्ट करण्यात येणार आहे. नुकतेच या सिनेमातले “धीमे धीमे’ हे आणखी एक गाणेही रिलीज झाले. त्यापूर्वी रिलीज झालेला सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांनी खूप पसंत केला आहे.
“अखियोंसे गोली मारे…’मध्ये गोविंदा ज्याप्रमाणे रविनाला उद्देशून हे गाणे म्हणत असतो, त्याप्रमाणे कार्तिक एकाचवेळी भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेला उद्देशून हे गाणे म्हणताना “पती, पत्नी…’मध्ये दिसणार आहे.
लग्न झाल्यानंतरही अन्य बायकांच्या पाठीमागे फिरणाऱ्या या लोफरला एकावेळी दोघींबरोबर डान्स करायचा असणार आहे. हे गाणे एका पार्टीमधील गाणे असणार आहे.