मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे चौकांमध्ये बॅनर लावल्याचेही काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. तसेच अजित पवार यांचीही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अनेकदा त्यांच्या बोलण्यातून दिसून आली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
सहा महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, या चर्चेबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली बाब म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.
आता मी तुम्हाला स्पष्टपणे एवढंच सांगू इच्छितो की, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. तेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा – विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाहीत म्हणजे बदलणार नाहीत. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी असे वक्तव्य केले. दरम्यान फडणवीस यांच्या वक्तव्यावरून असे स्पष्ट होते की, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे.
त्या बॅनरवर अजित पवार यांनी दिले होते स्पष्टीकरण –
दरम्यान, गेल्या महिन्यात (सप्टेंबर 2023) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा बॅनर लागले होते. या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. लागलेल्या बॅनरबाबत अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघाले आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात. माझ्या कानावर आले आहे की, माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबत बॅनर लागले आहेत.
राज्यात काही ठिकाणी अनेक नेत्यांचे असे बॅनर लागले आहेत. त्यात राज ठाकरे, पंकजा मुंडे यांच्या नावाचेही बॅनर लागले आहेत. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्याप्रमाणे ते बॅनर लावतात. त्यांना असे करण्यासाठी कोणीही सांगत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईला राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटलांचे आणि सुप्रिया सुळे असे तिघांचे बॅनर लागले होते. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी त्यांना नेहमी सांगतो की, असे कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने तसे होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर 145 आमदारांचा ‘जादुई आकडा’ गाठावा लागतो, असे अजित पवार म्हणाले होते.
तसेच असे बॅनर लावण्यामागे कोणतेही राजकारण नसते. कार्यकर्ते त्यांच्या भावनेतून असे बॅनर लावतात. तसेच ज्यांना 145 आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होतो. मागे उद्धव ठाकरेंनी गाठला, देवेंद्र फडणवीसांनी गाठला आणि आत्ता एकनाथ शिंदेंनी हा आकडा गाठला आणि ते मुख्यमंत्री झाले. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. मात्र, ती पूर्ण होण्यासाठी तेवढा आकडा गाठणे आवश्यक असते. मात्र, कार्यकर्ते उत्साहात आणि त्यांच्या भावनेतून असे बॅनर लावतात, असेही ते म्हणाले होते.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
आमदार अमोल मिटकरी यांनीही केले होते ट्विट –
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी 21 जुलै 2023 रोजी एक ट्विट केले होते. तेंव्हाही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच” असे ट्विट करत सोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील जोडला होता.
दरम्यान, आज बुधवारी (दि. 4 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.