मुंबई – मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबीराच्या प्रसिद्धी पत्रकातून अजित पवारांचे नाव वगळण्यात आल्यानंतर त्यांनी शिबिराकडे पाठ करत पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर आता कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांच्या यादीतूनच अजित पवार यांच्या नावाला डच्चू देण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
कर्नाटकात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादी पक्षाकडून शुक्रवारी करण्यात आली. यानंतर पक्षाकडून 10 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील अन्य नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पण या यादीमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगली होती. अचानकपणे अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने स्थिर राहील याबाबत माहिती देणे, ईव्हीएमचे समर्थन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करणे अशा विविध कारणास्तव ते भाजपामध्ये जाणार असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले होते.
मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने केलेल्या कोंडीमुळे अजित पवार यांचे भाजपाप्रवेशाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे सांगितले जात आहे.