मुंबई – वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातचं व्हावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला गेला. यातून महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचाही प्रयत्न आहे, असा आरोपी त्यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवारांनी पत्रात म्हटले आहे की, वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रिकेशनचा तळेगाव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60:40 असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे 2 लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे 1.5 लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली.
जागा निवडीसाठी एकूण 100 मुद्द्यांचा विचार करून त्यांनी तळेगाव टप्पा 4 ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगाव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील 1000 एकर जागेची निवड केली होती.
वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करून तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र, वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही.
गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे. परंतु ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.