Amol Mitkari on Vijay Shivatare| बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहे.
“बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, 50 वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधाची अपक्ष उमेदवार बनून बारामती लोकसभा लढवण्यासंदर्भात शिवतारे यांनी सोमवारी घोषणा केली. सध्या हे दोन्ही नेते महायुतीत एकत्र आहेत. मात्र तरीही त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
मा.@mieknathshinde साहेब शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केलाय. महायुती सोबत राहुन जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करित असतील तर आमचाही नाईलाज होईल..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2024
विजय शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवतारे यांना आवरा, अशी विनंती केली आहे. ‘एकनाथ शिंदे साहेब विजय शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केला आहे. शिवतारे महायुतीत राहुन अजित पवारांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करत असतील तर आमचाही नाईलाज होईल,’ असे मिटकरी यांनी लिहिले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन 2019 च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान दिले आहे.
हेही वाचा:
भाजपची दुसरी यादी तयार ! 100 नावांचा झाला विचार, जाणून घ्या उमेदवार कधी येणार?