Ajinkya Rahane : कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे येणार ?

मुंबई – ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. संघाचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणेने ( Ajinkya Rahane ) अत्यंत हुशारीने सांभाळले आहे. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपदी त्याच्याकडेच सोपवले जाईल, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे. अर्थात, बीसीसीआयने हे वृत्त नाकारले असून कोहलीच्या कर्णधारपदाला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे आता अजिंक्‍यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. हुशार नेतृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची रहाणेची वृत्ती निवड समितीतील सदस्यांनाही भावली असल्यानेच निदान कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला सोपवावे असाही विचार अनेक सदस्यांनी मांडलेला आहे. 

रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशामुळे आगामी काळात ड्रेसिंग रुममधील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचेही संकेत बीसीसीआयने ( BCCI ) दिले आहेत. त्यातच कोहलीपेक्षा रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना जास्त सोपे वाटते, तसेच कोणतेही दडपणही येत नाही, अशा खेळाडूंच्या भावना आहेत.

रहाणेकडून इन्कार….. 

विराट कोहलीचे ( Virat kohli ) संघात पुनरागमन झाले. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत कोहली पुन्हा मैदानावर दिसेल. संघाचा तो नियमित कर्णधार असल्याने हे होणारच होते. मला नेतृत्वाची संधी दिली जाईल असे वृत्त माझ्याही कानावर आले आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. कोहली पालकत्व रजेवर होता त्यामुळे तो संघात परतल्यावर तोच नेतृत्व करणार हे उघड होते. त्यामुळे सध्यातरी या विषयावर बोलण्यात रस नाही, असे मत रहाणेने व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.