पंढरपूर – विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जीवाचे रान करतात. अशातच एका महिलेने विठ्ठल भक्तीतून स्वत:ची सहा एकर शेती विकून आलेल्या पैशातून तब्बल 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केले आहे. धाराशिव (dharashiv) जिल्ह्यातील बाई लिंबा वाघे (bai limba waghe) असे या महिला विठ्ठल भक्ताचे नाव आहे. सध्या त्यांनी केलेल्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
लिंबा वाघे यांनी स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे. “मला माझ्या विठुराया शिवाय आहे तरी कोण?” असे म्हणत आजीबाईंनी दान केले. त्यांनी शेती विकून आपले सर्वस्व विठुरायाच्या चरणी अर्पण केल्याचे म्हंटले जात आहे. सध्या या आजींबाईंचे अनेकजण कौतुक करत आहे.
वाघे यांची धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात 11 एकर शेती आहे. त्यांना वारसदार नसल्याने त्यांनी 78 लाखाला सहा एकर शेती विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशातून आपल्या लाडक्या विठुरायाला 18 लाख रूपयांचे 25 तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.