डेहराडून – चीन सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदलाने उत्तराखंडमध्ये हवाईतळ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्या संबंधात हवाईदलाच्या सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल राजेशकुमार यांनी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिदेवसिंह रावत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या हवाईतळासाठी जमीन देण्याची मागणी केली.
उत्तराखंडचा भाग चीन सीमेच्यादृष्टीने व्युव्हात्मकदृष्ट्या महत्वाचा आहे. त्यामुळे तेथे ऍडव्हान्स लॅंडिंग सुविधा निर्माण करणे, एअर डिफेन्स रडार बसवणे अशी कामे होणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीने या डोंगराळ राज्यात सोयीची जमीन मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी राजेशकुमार यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. हे राज्य चीन व नेपाळच्या सीमेलगत आहे. पंतनगर, जॉली ग्रांट आणि पिठोरगड येथील विमानतळांच्या विस्ताराची तसेच चौखुतिया येथेही विमानतळ उभारणीसाठी जमीन देण्याची मागणी त्यांनी केली.
त्याला विधायक प्रतिसाद देताना मुख्यमंत्री रावत यांनी सांगितले की आम्ही हवाईदलाला प्राधान्याने जमीन उपलब्ध करून देऊ. त्यासाठी सरकारचा एक नोडल अधिकारी नेमून उपलब्ध जागेचा शोध घेतला जाईल आणि ती जागा हवाईदलाला दाखवली जाईल असे ते म्हणाले.
राज्य सरकारने पंतनगर विमान तळ आणि जॉलीग्रांट विमानतळाच्या विकासासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांची माहितीही एअर मार्शल राजेशकुमार यांना दिली.