नेवासा – छत्रपती संभाजी नगर ते पुणे या महामार्गावर येणाऱ्या नेवासा फाटा हे ठिकाण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आहे. अयोग्य ठिकाणी बसवलेले रस्ता दुभाजक, ठिकठिकाणी व्यावसायिकांनी केलेले शेडचे तसेच टपऱ्यांचे अतिक्रमण, दुकानाच्या बाहेर लांबवर लावलेल्या पाट्या, भर चौकातच बनविलेले बस थांबे तसेच खासगी गाड्यांचे थांबे आणि उसाचे ज्यादा लोडचे ट्रक आणि ट्रॅक्टर यामुळे महामार्गावर रोजच्या रोज वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पहावयास मिळत आहे. तासनतास होणाऱ्या या ट्रॅफिक जॅममुळे वाहन धारकांबरोबरच व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत.
अनेक वेळा बांधकाम विभाग तसेच तहसीलदारांना निवेदन देऊनही रस्ता दुभाजक काढण्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे अशीच वाहतूक कोंडी कायम पहायला मिळणार का? असा प्रश्न आता नेवासा फाटा येथील नागरिक विचारत आहेत.