ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवले
खेड – खेड (ता.कर्जत) येथील शिवशंभोनगर प्रभाग क्र.१ मधील रा.मा. ५४ ते शिवशंभोनगर या २ किमी तर प्रभाग ४ मधील रा. मा.५४ ते आगवणवस्ती वायसेवाडी या २ किमी ग्रामीण मार्गाला हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी पाठपुरावा करून कर्जत तालुक्यातील तब्बल १० रस्त्यांसाठी ४६ कोटी ५० लाखांचा एवढा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये खेड येथील दोन रस्त्यांचा समावेश आहे.
गेली अनेक वर्षांपासून शिवशंभोनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने जाणे शक्य नव्हते. शाळकरी मुलांनाही शाळेला जाणे कठीण होत होते. मात्र, आता इथल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आ. राम शिंदे यांनी जाहीरपणे रस्त्याच्या कामाचा शब्द दिला आणि तो काहीच दिवसात खराही करून दाखवला. आ.राम शिंदेंच्या कामाचा हा अनुभव नागरिकांना सुखद धक्का देऊन गेला. रस्त्याला मंजुरी मिळताच हभप सतीश महाराज मोरे व नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
रोहित पवारांचा श्रेयवादाचा केविलवाणा प्रयत्न!
खेडच्या दोन्हीही मंजूर रस्त्यांसाठी धनंजय मोरे यांनी आ.राम शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. हिवाळी अधिवेशनात रस्त्यांना मंजुरी मिळताच आ.रोहित पवारांनी सोशल मीडियावर श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांना तो रस्ता तरी माहित आहे का? जर श्रेय घेण्याची इतकी सवयच असेल तर पाठपुराव्याचा कागद दाखवावा, असा टोला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे यांनी लगावला आहे.