टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस खरेदी करणार्या व्यापार्याची तीन लाख रूपये रक्कम ठेवलेली बॅग दिवसा दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी लंपास करून पोबारा केल्याने टाकळीभान येथे खळबळ उडाली. ही घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली.
टाकळीभान येथे श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावर जय संताजी ट्रेडींग नावाचे कापूस व्यापारी रामेश्वर लोखंडे यांचे दुकान आहे. आज सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान ते दुकानात आले. पैशाची बॅग गळ्यात अडकवून ते खुर्चीवर बसलेले होते. या बॅगेत तीन लाख रूपये होते. यावेळी काळ्या रंगाच्या बिना नंबर दुचाकीवर तीन अज्ञात लोक आले.
त्यापैकी एक व्यक्ती दुचाकीवर बसून राहिला. दोन व्यक्ती दुकानात आले. त्यांनी या व्यापार्याच्या गळ्यात अडकवलेली पैशाची बॅग लंपास केली . या बॅगेत आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड होते. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पो. काॅ. प्रशात रणनवरे, दादासाहेब लोंढे, पोलिस मित्र बाबा सय्यद यांनी दुकानाला भेट देउन माहिती घेतली. या घटनेबाबत व्यापारी रामेश्वर लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.