शेवगाव – शेवगाव – गेवराई मार्गावर राक्षी गावाजवळ बस व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. नगर आगारातून सकाळी सुटलेली अहमदनगर-पुसद बस क्रमांक (एम. एच. 46 वाय 5577) ही बस राक्षी गावाजवळून जात असता गेवराईहून शेवगावकडे येणारा (एम. एच. 8 डब्ल्यू 1471) क्रमांकाचा टेम्पो चालक मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात बसवर जोरात धडकला.
यामध्ये टेम्पो चालक जावेद इलियास शेख (वय 34, रा. गेवराई) हे जागीच ठार झाले.तर त्याच टेम्पोने प्रवास करणारे त्यांचे पाहुणे सचिन अजिज बागवान (वय 27) हे गंभीर जखमी झाले, तर बसमधील शेख अलीला अहमद (वय 50, रा. पाथर्डी) यांच्या दाताला गंभीर स्वरूपाची जखम झाली, तर आकाश रोटे (वय 20) यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. जखमींना शेवगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतास शवविच्छेदनासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
हा अपघात सकाळी साडे नऊच्या सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने लोक घटनास्थळी धावले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात हालविले. एसटीचे कर्मचारी व शेवगाव आगार प्रमुख वसुदेव देवराज हेही घटनास्थळी लगेच मदतीसाठी धावून आले.