श्रीरामपूर – शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विजया उर्फ उज्वला बाबासाहेब भोडगे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला. मुठेवडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच विजया भोडगे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार रवींद्र दिनकर मुठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फत चौकशी अहवाल मागवला होता.
गटविकास अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून उपसरपंच भोडगे यांनी ग्रामपंचायती मालकीच्या जागेत अतिक्रमण केले आहे, असा अहवाल दिला होता. त्या अहवालावरून जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अपात्र असल्याबाबत निर्णय दिला. त्यामुळे विजया भोडगे यांचे सदस्य पदाबरोबर उपसरपंचपदही रिक्त झाले आहे. मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे यांनी संगीता मुठे यांच्या दिराने साईनाथ मुठे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले म्हणून तक्रार केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांचा अभिप्राय मागवला होता. त्यात गटविकास अधिकारी यांनी संगीता मुठे यांच्या नावावरती व कुटुंबाचे कुठेही अतिक्रमणाची नोंद नसल्याचा अभिप्राय दिल्यामुळे सागर मुठे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्यामुळे संगीता मुठे यांचे सदस्य पद कायम राहिले आहे.
तिसरी तक्रार गोरख सजन जाधव यांनी लंका दिनकर मुठे यांच्या विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या जागेत खोकर फाटा ते खानापूर रोडवर अतिक्रमण करून गाळा बांधल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी चौकशी करून अहवाल मागवला होता. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अतिक्रमण असल्याचे नमूद केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी गोरख सजन जाधव यांचा अर्ज मंजूर केला. त्यामुळे लंका मुठे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र करण्यात आले. लंका मुठे यांनी नाशिक उपआयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले. त्यास नाशिक उपआयुक्त यांनी लंका मुठे यांच्या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. विखे- मुरकुटे गटाच्या वतीने अॅड. अमोल धोंडे यांनी काम पाहिले.