संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शन
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयायी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मोठ्या संख्येने भीमसागर लोटला होता.
कोरेगाव भीमासह पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दिवसभरात लाखो भीमसैनिकांनी मानवंदना दिली. विजयस्तंभ येथील मानवंदनेनंतर हे भीमसैनिक कोरेगाव भीमा येथे दाखल झाल्यानंतर येथून पीएमपीएलच्या बसमधून वढू येथे देखील जात होते.
वढु बुद्रूक येथे भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्तात वाढ केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांचे समाधीस्थळावर बॅरिगेटींग करण्यात आले होते.
वढुमध्ये सकाळपासुनच दोन्ही समाधीस्थळावर अभिवादन व नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक हजर झाल्याचे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले.