नगर (प्रतिनिधी) – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करत नगर महापालिकेचे सन 2021-2022 चे 684 कोटी 89 लाखाचे मुळ अंदाजपत्रक आयुक्त शंकर गोरे यांनी आज स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचेकडे सादर केले. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 305 कोटी 95 लाख, भांडवली जमा 332 कोटी 63 लाख धरण्यात आले आहेत. तसेच करोना लसीकरण सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी त्यात म्हटले.
उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. अपेक्षित दुरुस्त्यांसह स्थायी समितीकडून हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर महासभेत त्यावर चर्चा होईल.
शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीची मनपा हिस्स्याची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सोलर प्रकल्प, ग्रीम स्पेसेस इ. कामे तसेच घनकचरा संदर्भातील डीपीआरमधील कामे, शहरातील चितळेरोड 1214 भाजी मार्केट जागा विकसीत करणे, नाट्यगृहचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, तसेच शासकीय योजना पूर्ण करणे व शहरातील विविध भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने 715 कोटी 51 लाखांचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला होता. त्यास महासभेने वाढीव तरतुदींसह मंजुरी दिली होती. त्यामध्ये महापौर पदाधिकार्यांसाठी 5 कोटी 15 लाखांच्या विकास निधीची तरतूद केली होती.
तसेच महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी 40 कोटी 50 लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी 53 कोटी 24 लाख, जी एस टी अनुदान 103 कोटी 40 लाख व इतर महसुली अनुदान 9 कोटी 33 लाख, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 22 कोटी, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी 42 कोटी, संकीर्णे 9 कोटी इ. महत्वाच्या बाबीसह महसुली खर्च 255 कोटी 24 लाख धरण्यात आला आहे. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन 385 कोटी 71 लाख अंदाजित जमा होणार आहेत.
तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 122 कोटी, पेन्शन 38 कोटी, पाणी पुरवठा विज बिल 31 कोटी 50 लाख, स्ट्रीट लाइट विज बिल 6 कोटी 50 लाख, शिक्षण मंडळ वर्गणी 4 कोटी, महिला व बाल कल्याण योजना 51 लाख, अपंग पुनर्वसन योजना 51 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 1 कोटी 52 लाख, सदस्य मानधन 1 कोटी 80 लाख, औषधे व उपकरणे 60 लाख,
सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 6 कोटी 11 लाख, कचरा संकलन व वाहतूक 5 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 70 लाख, टॅकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 82 लाख, अशुध्द पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेई 1 कोटी 85, नविन रस्ते 1 कोटी 75 लाख, रस्ते दुरुस्ती 1 कोटी 75 लाख, इमारत दुरुस्ती 40 लाख,
शहरातील ओढ नाले साफसफाई 41 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 40 लाख, कोंडवाड्यावरील खर्च 20 लाख, वृक्षारोपन तदनुषंगिक खर्च 20 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 35 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 2 कोटी 50 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 10 लाख यासह इतर बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.