- स्मशानभूमीमधील दहन स्टॅंडची चोरी
- अंत्यसंस्कार करणे झाले कठीण
वडगाव मावळ – जांभूळ व ब्राह्मणवाडी (साते) येथील स्मशानभूमीमधील मृतदेह दहन स्टॅंडवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या संदर्भात जांभूळ व ब्राह्मणवाडी येथील ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. स्मशानभूमीतील हायमक्स दिवे चोरीला गेले आहेत. मृतदेह दहन स्टॅंड नसल्याने मृतदेह दहन करताना रचलेले सरण कोसळून अवयव अपूर्ण जळल्याचे प्रकार घडत आहेत. ब्राह्मणवाडी येथील दोन व जांभूळ येथील दोन असे एकूण चार मृतदेह दहन स्टॅंड चोरीला गेले आहेत.
स्मशानभूमीत केवळ अंत्यसंस्कार, सावडणे व दशक्रिया आदी विधीला नागरिकांची गर्दी असते. इतरवेळी स्मशानभूमीत कोणी येत नाही. त्यामुळे निर्मनुष्य असलेल्या परिसरात चोरटे बिनधास्तपणे वावरत असून त्यांनी अक्षरशः स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टॅंड व हायमॅक्स दिवे चोरून नेले आहेत. चोरटे स्मशानभूमीत डल्ला मारत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीला शासनाकडून नुकत्याच मृतदेह दहन स्टॅंड भेटले होते. त्याची चोरी झाल्याने रक्षण कोण करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशानभूमी निर्मनुष्य ठिकाणी असल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत आहे. पोलीस प्रशासनाने चोरट्यांना अटक करावी. तसेच संबंधित विभागाने त्वरित येथे नवीन मृतदेह दहन स्टॅंड बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
माजी उपसरपंच रामदास शिंदे, जगन्नाथ शिंदे, उमेश शिंदे, बजरंग नवघणे, विजय शिंदे, प्रवीण शिंदे, कान्हू बोऱ्हाडे आदींनी या चोरट्यांना अटक करण्याची मागणी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
स्मशानभूमीतही चोरट्यांचा डल्ला
आतापर्यंत मंदिरातील दान पेटी तसेच घरातील ऐवज तसेच प्रवासात महिलांच्या दागिन्यावर चोरांनी हात साफ केलेले ऐकीवात होते. परंतु मावळ तालुक्यातील जांभूळ आणि ब्राह्मणवाडी गावामध्ये अक्षरश: स्मशानभूमीतील मृतदेह दहन करण्यासाठी बसविलेल्या दहन स्टॅंडचीच चोरी झाली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.