शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसुल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी प्रथम साईंच्या द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन दिले.यानंतर समाधी मंदिरात जाऊन समाधीवरील पादुकांची पूजा केली आणि समाधीला प्रदक्षिणा घातली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपुर आरती करण्यात आली. दर्शनानंतर संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पंतप्रधानांना साई संस्थानच्या वतीने शॉल आणि सीईओ पी. शिवा शंकर यांनी मुर्ती भेट देऊन सत्कार केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधानांना साईबाबांची विभुती आणि साईसच्चरित्र ग्रंथ भेट दिला. पंतप्रधानांनी साईबाबांच्या समाधीवर भगवी शाल अर्पण केली.
साई संस्थानने बांधलेल्या दर्शनरांग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी काकडी येथील कार्यक्रमातुन दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. जवळपास वीस मिनिटे ते मंदिर व परिसरात होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरीक, ग्रामस्थ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पंतप्रधानांचे आगमन होतांना आणि ते परततांना भारत मातेचा जयजयकार आणि मोदी मोदी असा जल्लोष करण्यात आला. पंतप्रधानांनी गाडीतून हात हलवून उपस्थितांना प्रतिसाद दिला. मंदिर परिसरात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती असलेल्या महाद्वारातून पंतप्रधानांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. या भेटीत पंतप्रधानांनी संस्थानच्या शेरेबुकात कोणतीही नोंद केली नाही.