संगमनेर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (दि.22) दुपारी 3 वाजता जाणता राजा या 6 एकराच्या मैदानावर विराट सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे.
आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण केले होते.
मात्र, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर व सरकारला कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी कालावधी देण्यात यावा यासाठी त्यांनी उपोषण मागे घेतले होते. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश दिले आले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सरकारने दि. 24पर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून, अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला येथून जरांगे पाटील संगमनेर शहरात येणार आहेत. त्यांचे मराठा समाजातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर जाणता राजा मैदान येथे त्यांची सभा होईल. सभेसाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर व तालुका सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.