नेवासा – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व गुलालाची उधळण करत नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात जंगी स्वागत करण्यात आले.
आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेला गाड्यांचा ताफा नेवासा फाटा येथे दाखल होताच माजी उपसभापती किशोर जोजार व मुकिंदपूरचे माजी सरपंच सतिश निपुंगे यांच्या नेत्तृत्वाखाली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नेवासा फाटा येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करत तसा अध्यादेश त्यांच्या हाती शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपुर्द केला. या अभूतपूर्व यशाच्या जल्लोषानंतर परतीच्या प्रवासादरम्यान नेवासा फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत आले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे समाजात यावेळी मोठे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.