पाथर्डी – पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांतील पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागेच्या सन २०२३-२४ भरतीसाठी पदाची आरक्षण सोडत गुरुवारी (ता. ७) पाथर्डी तहसील कार्यालयात होणार असून, यासाठी संबंधित गावांतील सर्व नागरिकांना सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे.
पाथर्डी उपविभागातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १९६ गावांमधील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रियेसाठीचे जात, प्रवर्गनिहाय आरक्षणनिश्चिती करून त्याअंतर्गत समांतर आरक्षण ,तसेच महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी पाथर्डी तसील कार्यालयात याबाबत प्रांताधिकारी मते यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची विशेष बैठक पार पडणार आहे. पाथर्डी तालुक्यातील ११३, तर शेवगाव तालुक्यातील ८३ गावांना पोलीस पाटील मिळणार आहेत.
अनेक वर्षांपासून दोन्ही तालुक्यांत पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्याने इच्छुक उमेदवारासाठी दिलासा देणारी ही भरती असणार आहे. पोलीस पाटलांचे १९६ गावांतील पद रिक्त असलेल्या प्रशासनाला कायदा व्यवस्था व अन्य काम करण्यात मोठी अडचणीनीही निर्माण होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे, नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देऊन गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे अशी महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाला पोलीस पाटलांकडून होते. संबंधित गावांतील नागरिकांनी सोडतीसाठी उपस्थित राहावे, तसेच एखाद्या गावातील नागरिक आरक्षण सोडतेवेळी उपस्थित नसल्यास व्हिडिओ चित्रिकरणाद्वारे आरक्षण सोडत करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे प्रांताधिकारी मते म्हणाले.