पाथर्डी : प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आज शहरासह तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करत मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माहेश्वरी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात येऊन श्रीराम मंदिरात महाआरती करत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चौंडेश्वरी देवी मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन अकराशे दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. कालिका देवी मंदिरात रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने कारसेवकांचा सन्मान करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ मंदिरात सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील येळी येथे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताच्या वेळीच श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. यानिमित्ताने अनेकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढली तर अनेकांनी आपल्या घरावर दिवे लावत दीपोत्सव साजरा केला. सकाळी नवीपेठतून माहेश्वरी समाजाने आयोजित केलेल्या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, महंत माधवबाबा, मोहन महाराज सुडके, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, अशोक गर्जे, श्रीकांत जाजू, संदीप बाहेती,रमन लाहोटी. सचिन बजाज, जगदीश डागा,डॉ. विलास बाहेती, गोविंद लाहोटी,ओम डागा,उमा बजाज,उज्वला बाहेती,स्मिता जाजू,जया डागा यांच्यासह हिंदू युवा मंचाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही मिरवणूक माहेश्वरी श्रीराम मंदिरात आल्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी या मंदिरात दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.
संत वामनभाऊ मित्रमंडळ व श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामावर आधारित जिवंत देखावा, महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, महाप्रसाद व सायंकाळी स्वामी समर्थांच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. येळी येथे संजय बडे यांच्या पुढाकारातून श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी हभप रामगिरी महाराज, आमदार मोनिका राजळे हे उपस्थित होते. कालिका देवी मंदिरात बंग मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुधाकर पाथरकर, सुनील पाथरकर, शंकर पाथरकर, शरद पाथरकर, रमेश बाहेती ,नंदकुमार डाळिंबकर, सीताराम बाहेती,अशोक बाहेती,अशोक गर्जे,अशॊक मंत्री,अनिल नागापूरे, अशोक ढाकणे, शेषराव बेळगे, अशोक चोरमले, बाळू छाजेड, दीपक काबाडी, संजू चिंतामणी, पुरुषोत्तम हारकुट, अनिल लाहोटी, द्वारकानाथ बंग या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. या शिवाय नवीपेठेतील गणेश मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.