नगर – जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दि. २१ रोजी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या , लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.