अहमदनगर (प्रतिनिधी)- दोघा सख्ख्या भावांनी महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याप्रकरणी त्रासाला वैतागत युवतीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, सोहेल शेख व सरफराज शेख (दोन्ही रा. गजराजनगर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे एकमेकांचे सख्खे भाऊ असून महाविद्यालयीन युवती बारावी परीक्षेला जात असताना दोघा आरोपींनी पाठलाग करून तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याकडे युवतीने दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा आरोपींनी 15 जून रोजी युवतीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या मनस्तापाला कंटाळून युवतीने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध पडल्याने घरच्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुध्दीवर आल्यानंतर युवतीने आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. सख्ख्या भावांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल कर्यात आला आहे.