दहिवडी (प्रतिनिधी) : वाहनांचे टायर व बॅटऱ्या चोरणा-या परराज्यातील टोळीला दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून नऊ लाख 30 हजार रूपयांचे टायर व वाहनांच्या बॅटर्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.या कारवाईसाठी पोलिसांना बिजवडीतील पै.विजय रामहरी भोसले यांनी मोलाची मदत केली.
जितेंद्र रामसिंग धाकड (वय २५ वर्षे ) ,दिपक कैलास धाकड (दोन्ही रा. मोहना ता. घाटीगांव जि. ग्वाल्हेर राज्य मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.
याबाबतच मिळालेली माहिती अशी ,बिजवडी ता. माण येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला पै.विजय भोसले यांनी त्यांच्या घरासमोर त्यांचा टाटा कंपनीचा ट्रक उभा केला होता. दि.१६ जून रोजी मध्यरात्री भोसले यांना बाहेरून आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पहिले असता, काहीजण ट्रकचे टायर काढताना दिसून आले.त्यांनंत भोसले यांनी प्रसांगावधान राखत गावातील युवकांना फोन करून माहिती दिली. दरम्यान चोरट्यांना गावकरी येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी आयशर टेम्पोतून पळ काढला.
यावेळी भोसले यांनी गावातील युवकांच्या साथीने चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करून मोगराळेत त्यांना पकडले. यावेळी चोरटे व स्थानिक यांच्यात त्यांच्यात झटापट झाली. त्यामध्ये बिजवडीतील नितीन प्रकाश भोसले हा युवक जखमी झाला.दरम्यान दहिवडी पोलीसांना याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चोरट्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीसाठी वापरलेला आयशर टेम्पो ,९ मोठया वाहनाचे टायर (डिस्कसह), पाच बॅट-या असा ९ लाख ३०हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी सांगली जिल्हयातील सांगली शहर पोलीस स्टेशन व तासगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोर्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक डी.डी.तुपे,सहायक पोलीस फौजदार पी.जी. हांगे ,हवालदार संजय केंगले ,आर. पी. खाडे,आर.एस.बनसोडे, ए.एच.नदाफ, टी.एम.हांगे, के.आर.बर्गे यांनी केली.