नगर -महापालिकेच्या हलगर्जीपणा आता भोवला असून कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा ठपका ठेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपोमधील कचऱ्याचे विलगीकरण तसेच खतनिर्मिती प्रक्रियेवर योग्य पद्धतीने राबविली जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रदूषण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून तातडीने उत्तर मागितले आहे. नोटीस मिळाल्यानंतर महापालिकेने प्रक्रिया होऊ न शकणाऱ्या रिजेक्टेड मटेरीयलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचा खुलासा केला.
गेल्या काही महिन्यात खतनिर्मिती प्रकल्पात कोणतीही प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे लॅंडफिल साइटवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या सर्व अनागोंदी कारभाराची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे.
विविध प्रकल्प चालविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून ऑथरायझेशन करण्यासाठी मनपाने दस्ताऐवज सादर केलेले आहेत. नोटीसीनुसार बुरुडगाव कचरा डेपो येथे 100 टक्के कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्राप्त कचऱ्याचे विलगीकरणानंतर निघणाऱ्या जैविक कचऱ्यावर 4 ते 5 आठवड्यात खत निर्माती करण्यात येते. बुरुडगाव कचरा डेपो येथील लॅंडफिल साइटवर जाणा-या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कचरा डेपो येथे उपाययोजना केल्या खुलाशात स्पष्ट केले आहे.