नगर – नगर-पुणे महामार्गावरील केडगाव उपनगरातील अंबिकानगर भागात शनिवारी सकाळी बिबट्याचा थरार रहिवाशांनी अनुभवला. त्याने पंजा मारल्याने अरुण चौरे व दीपक धस हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्याला पकडण्यासाठी जुन्नरहून विशेष पथक केडगावकडे येत असल्याचे सांगण्यात आले. त्याची प्रतीक्षा होती. मात्र, तोपर्यंत अंबिकानगर परिसरात बघ्यांची पळापळ व कलकलाट सुरू होता. मात्र सहा तासांच्या थरारा नंतर वन विभाग व पोलीस प्रशासनाला बिबट्या पकडण्यात यश आले.
पुणे महामार्गावरील अंबिकानगर बसथांब्यापासून समोरच्या बाजूने शाहूनगरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच रस्त्याच्या पलीकडे कुमटकर क्लासेसची इमारत आहे. तेथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कोणीतरी बिबट्याला पाहिले व हलकल्लोळ उडाला. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार्या अरुण चौरे व दीपक धस या दोघांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पंजा मारल्याने त्यांच्या हाताला व डोक्याला जखमा झाल्या आहेत. या दोघांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. या दोघांशिवाय आणखीही दोघेजण त्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची नावे व माहिती मिळाली नाही. यावेळी झालेल्या पळापळीतही खाली पडून काहीजण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
केडगावात बिबट्या आल्याची माहिती गावात व नगरमध्येही समजल्यावर त्याला पाहायला बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे त्याने कुमटकर क्लासेस इमारतीशेजारील एका घरात आश्रय घेतला. परिसरातील त्याचे अस्तित्व भीतीचे असल्याने बहुतांश रहिवाशांनी घरांना आतून कड्या-कुलुपे लावून आत थांबणेच श्रेयस्कर मानले.
वन विभागाच्या कर्मचार्यांनी तो जेथे लपून बसला, त्या घराच्या बाहेर जाळ्या लावल्या होत्या व त्याला पकडण्यासाठी जुन्नरहून विशेष पथकाला पाचारण केले आहे. दरम्यान, दोन बिबटे होते व त्यापैकी एक बिबट्या डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या बंगल्याच्या परिसरात आधी घुसला व तेथून मग पाठीमागील नाल्याच्या दिशेने गेल्याचे काहींनी सांगितले. त्यानंतर दुसरा बिबट्या त्याच परिसरातील एका घरात लपून बसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचे मोबाईलमध्ये फोटो व व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न अनेकजण करीत होते. मात्र वन विभागाच्या व पोलीस प्रशासनाच्या मदतीने तब्बल ६ तासांच्या थरार नंतर बिबट्या पकडण्यात यश आले.