काबूल – अफगाणिस्तानातील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर खोऱ्यावर तालिबानने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबान्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर आता पंजशीर खोऱ्यातून तालिबानचा प्रतिकार करणारा अहमद मसूदने टर्कीला पलायन केल्याचे वृत्त होते. पण तो अफगाणमध्येच सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पंजशीरच्या 70 टक्के मुख्य भागांवर आता तालिबानचे नियंत्रण आहे. तसेच अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद टर्की किंवा इतर कोणत्याही देशात पळून गेल्याच्या अफवा खोट्या आहेत. मसूद हा अफगाणिस्तानातच सुरक्षित ठिकाणी आहे, असे इराणीच्या “फार्स’ या वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात तालिबानने आतापर्यंत अजिंक्य असलेल्या पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तालिबानचा मुकाबला करणाऱ्या बंडखोर लष्कराने राष्ट्रीय विरोध आघाडीने (एनआरएफ) हा दावा फेटाळला. एनआरएफचे नेतृत्व अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह करत आहेत. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले होते.
मसूदचे निकटवर्तीय कासीम मोहम्मदी यांनी फार्स या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. अलीकडच्या काळात तालिबानने पंजशीरमध्ये प्रवेश केला आहे आणि आता त्यांनी मुख्य रस्त्यांच्या 70 टक्के भाग व्यापला आहे, पण पंजशीर खोरे अजूनही पूर्णपणे बंडखोरांच्या नियंत्रणात आहे, असे कासीम मोहम्मदी यांनी म्हटले आहे.