टोकियो – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात आज टोकियो इथे अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक विषयांवर विचारांचे आदानप्रदान केले तसेच, दक्षिण आशिया आणि हिंद-प्रशांत प्रदेशाशी संबंधित परस्पर मुद्यांवरही चर्चा करत मुक्त,खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत प्रदेशासाठीची आपले सामायिक विचार व्यक्त केले. समृद्धीसाठीच्या हिंद-प्रशांत आर्थिक मंचाच्या प्रारंभाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा संवाद पुढेही सुरु ठेवण्यास आणि भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारी उच्चस्तरावर नेण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
भारत-अमेरिका यांच्यातील सर्वसमावेशक राजनैतिक जागतिक भागीदारी, लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य यांच्याप्रती असलेल्या सामायिक कटिबद्धतेवर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कायद्यांप्रती असलेल्या विश्वासावर आधारलेली आहे. या बैठकीत, दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रात द्वीपक्षीय अजेंडे पुढे नेण्याच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.
तसेच, गुंतवणूक-प्राणित करारावर झालेल्या स्वाक्षऱ्यांचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या करारामुळे अमेरिकेतील विकास वित्त महामंडळ, भारतातील आरोग्य सुविधा, अक्षय ऊर्जा, लघु आणि मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा यात सामायिक प्राधान्याच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक सुरू ठेवू शकेल.
भारतातील राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्या माध्यमातून, दोन्ही सरकारे, विचारवंत आणि अभ्यासक तसेच उद्योग क्षेत्र यांच्यात दृढ संबंध निर्माण होऊ शकतील विशेषतः, कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5-6, बायोटेक, अंतराळ आणि सेमी कंडक्टर्स अशा क्षेत्रात एकत्रित काम करणे सुलभ होईल.
भारत-अमेरिका यांच्या द्विपक्षीय अजेंडयात संरक्षण आणि सुरक्षा विषयक सहकार्याला विशेष स्थान आहे, हे नमूद करत, दोन्ही देशांनी,हे सहकार्य अधिक दृढ कसे करता येईल, यावर चर्चा केली. दोन्ही देशांमधील नागरिकांचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी, उभय देशातील उच्चशिक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत केले जावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.