सातारा : साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या महत्वपूर्ण माहिती समोर येत आहेत. आढळून आलेल्या या तीन कबरी असल्याच्या वृत्ताला खुद्द साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. दरम्यान, इतिहास अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. त्यामुळे या तीन कबरी नक्की कोणाच्या आहेत यावर चर्चा सुरु झाली आहे.
प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरून हटवण्यात आले आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत असल्याचा दावा करतही यावरुन अनेकदा वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणाला जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. अखेर शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत महसूल विभाग आणि वनविभागाकडून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला.