पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा अखेर काल निकाल जाहीर झाला असून, भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा परिसरातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. धंगेकर यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहे.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, कसब्यातील विजयानंतर रविंद्र धंगेकर यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.
पुणे शहरातील 2009 आणि 2014 च्या कसबा विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना चांगलीच फाईट दिली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.
पण काल झालेल्या निवडणुकीनंतर मागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. सध्या त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.