मुंबई – सुपरस्टार प्रभास ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. नुकतेच तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने रामाची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या चित्रपटातील संवाद, वेशभूषा यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र या चित्रपटाच्या अपयशानंतर प्रभास आगामी चित्रपटात एका खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
आदिपुरुषनंतर प्रभास आणखी एका पौराणिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आगामी चित्रपटात तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासचे वडील सूर्यनारायण राजू यांनी ‘भक्त कन्नप्पा’ ची निर्मिती केली आहे. ‘कनप्पा’ या भक्तिमय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या विष्णू मंचूने सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी प्रभासशी संपर्क साधला. त्यानंतर प्रभासने देखील भगवान शिवची भूमिका करण्यास होकार दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कन्नप्पा सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग करत आहेत. तर या चित्रपटाचे लेखन परचुरी गोपालकृष्ण, बुर्रा साई माधव आणि थोटा प्रसाद यांनी केले आहे आणि मणि शर्मा आणि स्टीफन देवासी यांना संगीत दिले आहे. चित्रपट समीक्षक मनोबाला व्ही आणि रमेश बाला यांनी X (ट्विटर) वर ही माहिती दिली आहे. प्रभास आणि विष्णू मंचूचा एकत्र फोटो शेअर करत रमेश बाला यांनी लिहिले, “विश्वसनीय सूत्रांनुसार, स्टार प्रभास अभिनेता विष्णू मंचूच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘कन्नप्पा- ए ट्रू एपिक इंडियन टेल’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. ”
विष्णू मंचू यांनी रमेश बाला यांची पोस्ट पुन्हा पोस्ट करून “हर हर महादेव, कन्नप्पा” असे कॅप्शन दिले आहे. हे सिद्ध झाल्यास प्रभास तिसऱ्यांदा देवाची भूमिका साकारणार आहे. याआधी त्याने आदिपुरुषमध्ये भगवान रामाची भूमिका केली होती आणि ‘कल्की 2898 एडी’ मधील त्याची भूमिका भगवान विष्णूवर आधारित असल्याचे म्हटले जाते आहे. याशिवाय तो केजीएफचे प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’मध्ये देखील दिसणार आहे.