नवी दिल्लीः काही महिन्यांपूर्वीच देशाच्या संसदेला नवीन इमारत मिळाली होती. त्यानंतर आता देशाच्याआणखी एका ऐतिहासिक वास्तूचे रुपडे बदलणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला देखील नवीन इमारत मिळणार आहे. याविषयीची माहिती खुद्द सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बार असोसिएशनकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, ‘सर्वोच्च नायायालयामध्ये नवीन इमारत उभी करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये अतिरिक्त २७ कोर्ट, ४ रजिस्ट्रार कोर्टरुम आणि इतर पुरेशा सुविधा असणार आहेत.
पुढे बोलताना चंद्रचूड यांनी,’वेळेत न्याय मिळणे आणि न्याय व्यवस्थेचं सुलभीकरण करणे हे न्यायपालीकेसमोर मोठं आव्हान आहे. समाजव्यवस्थेच्या शेवटच्या घटकाला न्यायप्रणाली सोपी वाटली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे’, असेही म्हटले.
भारतीय भाषांमध्ये कोर्टाच्या निकालाचं भाषांतर होण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये म्हटले होते. त्याचाही उल्लेख सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बोलतांना केला. तसेच न्यायप्रणालीला सुगम करण्यासाठी व्यापक बदल अपेक्षित आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.