नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणच्या एका व्यावसायिकाने आपल्या दोन मुलांच्या डोळ्यादेखत त्यांच्या आईचा म्हणजेच त्यांच्या पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा खून अगदी क्षुल्लक कारणासाठी झाला आहे. पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपीच्या गैरहजेरीत पत्नी इन्स्टाग्रामवरील लोकांना गुपचूप भेटते, असा संशय आरोपीला होता. याच संशयातून हत्या झाल्याचे समजत आहे. घटनेच्या दिवशी रविवारी पहाटे आरोपी आपली १२ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलगा आणि पत्नीसह एसयूव्ही कारने रायबरेलीच्या दिशेनं जात होता. त्यानंतर आरोपीनं अचानक पूर्वांचल महामार्गावर गाडी वळवली. सुलतानपूर परिसरात पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने एसयूव्ही कारमध्ये आपल्या दोन मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीचा गळा आवळला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेचे इन्स्टाग्राम खाते लॉक असून प्रायव्हेट आहे. तिने कथितरित्या पतीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. आरोपीला संशय होता की, त्याच्या गैरहजेरीत त्याची पत्नी काही सोशल मीडिया फॉलोअर्सला भेटते. त्यामुळे या जोडप्यामध्ये अनेकदा वाद झाले होते.
एका इंग्रजी वर्तमानत्रानुसार, आरोपी हा ‘टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी’चा मालक आहे. तर त्याची पत्नी गृहिणी होती. हे जोडपे लखनऊच्या पॅरा परिसरात १२ वर्षीय मुलगी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होते.