उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जैतपूर शहरातील मोहल्ला बायपास येथे विवाहित महिलेचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू पतीला सहन न झाल्याने अंत्यसंस्कार सुरू असताना पतीने पत्नीच्या चितेत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी वेळीच सावध होत त्यास बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला.
ब्रिजेश कुशवाह असे पतीचे नाव असून उमा कुशवाह मृत पत्नीचे नाव आहे. या घटनेत ब्रिजेश किरकोळ भाजला गेला. ब्रिजेश आणि उमाचे 2016 साली लग्न झाले होते. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी ब्रिजेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याची अवस्था पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले.
दुसरीकडे हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून मुलीचा छळ होत असल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. सासरचे लोक तिला मारहाण करत होते. याशिवाय तिचा मृतदेह बेडरूममध्ये जमिनीवर पडलेला होता आणि तिच्या गळ्यात दुपट्ट्याचा फास बांधलेला असल्याने ही घटना संशयास्पद मानली जात आहे. मृत उमाची आई तेज कुंवर यांनी सांगितले की, आठवड्याभरापूर्वी तिच्या मुलीला पैशाच्या मागणीसाठी मारहाण करण्यात आली होती. त्यांनी जावायास घरी बोलावून त्याला 70 हजार रुपये दिले. मात्र ब्रिजेशने हे सर्वा आरोप फेटाळून लावले. पुढील तपास पोलीस करत आहेत.