नवी दिल्ली – आज दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पोस्टरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा फोटो गायब आहे. पोस्टरवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहे, मात्र अजित पवार त्यात कुठेही दिसत नाहीत.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षात जबाबदारीची मागणी केली होती, अशात ही घटना घडली आहे. गेल्या महिनाभरातच पक्षात संघटनात्मक बदल झाले असून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदाचा राजीनामा जाहीर केल्यावर अजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली, या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
त्याचवेळी अजित पवारांच्या मागणीवर शरद पवार म्हणाले की, असे निर्णय फक्त एक व्यक्ती घेऊ शकत नाही आणि त्यासाठी इतर दिग्गज नेत्यांनाही सहभागी करून घेतले पाहिजे. अजित पवार यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. शरद पवार म्हणाले की, आज प्रत्येक नेत्यामध्ये पक्ष संघटनेत काम करण्याची भावना आहे आणि अजित पवार यांनीही तीच भावना दाखवून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल झाल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, ‘दादांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे’ असे मला वाटते. त्यांना संघटनेत संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. दादांना संघटनेत काम करायचे आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.