मुंबई – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आपल्या जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये कोहलीची बॅट तळपत आहे. त्यामुळेच १२ वर्षांनंतर भारतीय भूमीवर होणाऱ्या विश्वचषकात कोहलीकडून ‘विराट’ कामगिरीची सर्वांनाच अपेक्षा आहे. कोहली विश्वचषकात सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढू शकतो, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला आहे.
सेहवागच्या मते, विराट कोहली आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. सचिनच्या नावावर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये एकूण ४९ शतके आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 46 शतके ठोकली आहेत. म्हणजेच सचिनला मागे सोडायचे तर कोहलीला वर्ल्डकपमध्ये चार शतके झळकावी लागतील.
यासोबतच वीरेंद्र सेहवागने २०२३ च्या विश्वचषकाबाबत तीन मोठे भाकीत केले आहेत. वीरूने या स्पर्धेत धावा करू शकतील अशा तीन फलंदाजांची नावे सांगितली आहेत. सेहवागच्या मते, विश्वचषकात विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांची बॅट चांगलीच तळपेल आणि हे तीन फलंदाज स्पर्धेत सर्वाधिक धावा करतील. त्याचवेळी वीरूच्या म्हणण्यानुसार २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी विश्वचषकात जास्तीत जास्त विकेट्स घेण्यास सक्षम असतील, असा विश्वास सेहवागला आहे.
मुरलीधरननेही केले भाकीत
मुथय्या मुरलीधरनने आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये बॅटने कहर करू शकणार्या तीन फलंदाजांची नावे दिली आहेत. मुरलीधरनच्या मते, विराट कोहली, बाबर आझम आणि जो रूट यावेळी स्पर्धेत जास्तीत जास्त धावा करू शकतात. त्याचवेळी, माजी फिरकीपटूच्या मते, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवला जाऊ शकतो.