सोलापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे. यामुळे रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानीकडे रवाना झाले आहेत. यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
राहूल गांधी आणि कॉंग्रेसमधील अन्य तरूण नेत्यांबरोबर सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. ज्योतिरादित्य शिंदे तर यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट चोखाळली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेकांनी कॉंग्रेसला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.
सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या कॉंग्रेसजनांच्या मागे आता ईडीचे शुक्लकाष्ठ लागत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांना थेट अ. भा. कॉंग्रेस समितीने निमंत्रण धाडले आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे.
2002 मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांची उमेदवारी दिली होती. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ शिंदे हे दरवेळी “सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत.