बीड : मंत्री छगन भुजबळ यांना एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या बीडमधील परळी येथील निवासस्थानी फोनवर हा धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्याचा तपास करत आहेत.
“मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. मला तुम्ही 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडेंना जीवे मारेन,” असे फोन करत धनंजय मुंडे यांना धमकी दिली होती. या आता पोलिस तपास करत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून नेत्यांना धमकी देण्याचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांच्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर छगन भुजबळ आणि आता धनजंय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
अजित पवार गटातील नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने ‘मला भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे. उद्या मी त्यांना मारणार,’ असा दावा केला होता. या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने तपास करत संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
आरोपी व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असून त्याला महाडमधून अटक केली आहे. प्रशांत पाटील हा मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी आहे. त्याने दारूच्या नशेत छगन भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास फोन केला होता. त्यावेळी त्याने ‘आपल्याला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. मी सर्व काम सांगून करतो. मी उद्या सकाळी छगन भुजबळ यांना मारणार,’ अशी धमकी त्याने फोनवरून दिली होती. याप्रकरणी आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.